Gadchandur : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे(CDCC) माजी संचालक तथा जिवती तालुक्यातील ज्येष्ठ नेते पांडुरंग जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट)मध्ये जाहीर प्रवेश केला.मुंबई येथील नंदनवन बंगल्यात 18 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात हा प्रवेश झाला.
यावेळी जाधव यांच्यासोबत जिवती तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेत पक्षात प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना पक्षाचे दुपट्टे घालून शिवसेनेत स्वागत केले.
या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे नेते,पदाधिकारी तसेच गडचांदूर शहरप्रमुख विक्की राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. जिवती तालुक्यातील एका प्रभावशाली नेत्याचा मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश झाल्याने आगामी काळात या परिसरातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान,चंद्रपूर जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. जाधव यांच्या पक्षप्रवेशाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले असतानाच जिल्हाप्रमुखांच्या अनुपस्थितीचीही चर्चा रंगली आहे.
पांडूरंग जाधव यांच्या प्रवेशामुळे जिवती तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार का? आणि आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा नेमका काय परिणाम होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
#Shiv Sena party entry ceremony.
"🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹"
