Chandrapur : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देतानाच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि औद्योगिक कंपन्या व कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासन कटीबद्ध असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्पष्ट केले.पोलीस सभागृह,तुकुम रोड,चंद्रपूर येथे जिल्ह्यातील विविध कंपन्या,वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL),औद्योगिक प्लांट व आस्थापनांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
बैठकीस अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर प्रमोद चौघुले,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल बारापत्रे,रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके,दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर,पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोकाडे यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे १०० कंपन्या,WCL व विविध औद्योगिक आस्थापनांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत औद्योगिक परिसरातील सुरक्षा,भंगार चोरी,कामगारांची सुरक्षितता,वाहतूक व्यवस्था तसेच बेकायदेशीर दबाव व खंडणीच्या प्रकारांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
चोरी व भंगार चोरीवर पोलिसांची करडी नजर :
WCL तसेच इतर कंपन्यांच्या परिसरातील चोरी व भंगार चोरीच्या घटना रोखण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्रंदिवस गस्त वाढविण्यात येणार आहे.संवेदनशील ठिकाणी पोलिसांची विशेष नजर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ब्रह्मपुरी ओव्हरब्रिज परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना :
ब्रह्मपुरी ओव्हरब्रिज परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता,आवश्यकतेनुसार अतिरिक्त वाहतूक पोलीस कर्मचारी व बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधला जाणार आहे.
कामगारांना विमा संरक्षण देण्याचे आवाहन :
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातात कामगारांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक आधार मिळावा,यासाठी कंपन्यांनी कामगारांचा विमा उतरविणे आवश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी धारिवाल कंपनीने कामगारांचे बँक खाते उघडतानाच विमा जोडल्याची,तर डालमिया सिमेंटने कामगारांना पहिल्याच दिवसापासून विमा संरक्षण दिल्याची माहिती देण्यात आली.या धोरणाचे अनुकरण इतर औद्योगिक आस्थापनांनीही करावे,असे आवाहन करण्यात आले.
हेल्मेटसह सुरक्षा साधनांच्या वापराबाबत जनजागृती :
औद्योगिक परिसरात कामगारांकडून हेल्मेट व इतर सुरक्षा साधनांचा योग्य वापर न होणे चिंताजनक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या माध्यमातून औद्योगिक आस्थापनांमध्ये विशेष प्रबोधन मोहीम राबविण्यात येणार असून,वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
खंडणी व बेकायदेशीर दबाव खपवून घेतला जाणार नाही :
कामगारांना हाताशी धरून कंपनी व्यवस्थापनावर धमकी देणे, अनुचित दबाव आणणे अथवा बेकायदेशीर आर्थिक मागणी (खंडणी)करण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिला.अशा प्रकारच्या घटना घडल्यास कंपन्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.संबंधितांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
औद्योगिक सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी पोलीस प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनामध्ये नियमित समन्वय ठेवण्यात येणार आहे.उद्योगांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि कामगारांच्या हिताचे संरक्षण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नमूद केले.बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी केले,तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले यांनी मानले.
#Chandrapur District police #Police action plan.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
