Rajura : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राजुरा तालुक्यातील सुब्बई गावात नुकतीच ग्रामसभा पार पडली.ग्राम पंचायतीच्या कारभारातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ व युवक आक्रमक झाले. यावेळी सरपंच सुरेखा आत्राम यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांविरोधात सर्वानुमते अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.तसेच,येत्या 15 दिवसांत प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्याचेही कळते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सुब्बई ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारून जवळपास 4 वर्षांचा कालावधी उलटला असतानाही गावात नियमित ग्रामसभा घेण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला.20ऑगस्ट रोजी ग्रामसभा होणार असल्याची माहिती केवळ एक दिवस आधी दवंडी देऊन जाहीर करण्यात आली.त्यामुळे कामाची रोजंदारी बुडवून 400 हून अधिक महिला,पुरुष आणि युवक ग्रामसभेसाठी उपस्थित झाले.
ग्रामसभेच्या ठिकाणी मोठी गर्दी आणि ग्रामस्थांचा रोष पाहता सुरुवातीला सभा रद्द झाल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.मात्र,नागरिकांचे झालेले आर्थिक नुकसान आणि प्रशासनाकडून होत असलेल्या कथित दिरंगाईमुळे उपस्थित युवकांनी आक्रमक भूमिका घेत सभा घेण्याची मागणी लावून धरली.अखेर सरपंचांना ग्रामसभेला उपस्थित राहावे लागले.
ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजावर तसेच कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.संतप्त नागरिकांनी सरपंचांकडे थेट राजीनाम्याची मागणी केली. यावेळी, “राजीनामा देणार नाही,पण गावाची माफी मागते,” अशी भूमिका सरपंचांनी मांडल्याचे सांगण्यात आले.मात्र,ग्रामस्थांनी माफी अमान्य करत राजीनाम्याची मागणी कायम ठेवली.
यानंतर सरपंचांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.दरम्यान, ग्रामसेवकांचे आंदोलन सुरू असल्याने ग्रामसेवक ग्रामसभेला उपस्थित राहू शकले नाहीत. सरपंचांना निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे ग्रामसेवकांकडून सांगण्यात आल्याची माहिती असून येत्या 15 दिवसांत संबंधित सरपंचांसह सर्व सदस्यांना अपात्र घोषित करून योग्य ती प्रशासकीय कारवाई न झाल्यास संपूर्ण गावकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील,असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे
गावाचा विकास,पारदर्शक कारभार आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी युवकांनी घेतलेल्या या पुढाकाराचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. आता प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते आणि पुढील कारवाई काय होते,याकडे सुब्बई ग्रामस्थांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
#Gram Panchayat Subbai. #Gram Sabha News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
