Gadchandur : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडचांदूर येथील नवीन पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यासमोरील परिसरात फळ व भाजीपाला विक्रेत्यांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहेत.परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून झाडे-झुडपे वाढल्याने पुतळ्याच्या परिसराची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. Encroachments surround the statues of Chhatrapati Shivaji Maharaj."
विशेष म्हणजे,महाराजांचा जुना अर्धाकृती पुतळा सुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.महाराजांच्या नाम फलकावर झाडांच्या फांद्या आल्याने फलक झाकला गेला असून तो सहज नजरेस पडत नाही.पुतळ्याला माल्यार्पण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसमोरही अडचणी निर्माण होत आहेत. पुतळ्यासमोर साहित्य ठेवण्यात आल्याने ये-जा करण्यासाठी पुरेसा मार्ग उपलब्ध नसल्याची तक्रार आहे.
या दोन्ही पुतळ्यांसमोरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवून, परिसराची स्वच्छता करावी,अशी मागणी भाजपचे कोरपना तालुका संघटन महामंत्री तथा स्वीकृत नगरसेवक सतीश उपलेंचवार यांनी केली आहे.या समस्येबाबत उपलेंचवार यांनी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेला निवेदन देऊन तसेच बैठकीतही हा मुद्दा मांडला होता.मात्र,अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नगर परिषदेच्या आवाहनावरही प्रश्नचिन्ह :
एकीकडे नगर परिषदेकडून नागरिकांना या परिसरात बॅनर लावू नयेत,असे आवाहन केले जाते; मात्र दुसरीकडे पुतळ्याच्या परिसरातील अतिक्रमण व अस्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपलेंचवार यांनी केला आहे.केवळ पाहणी दौऱ्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर कामांची प्रसिद्धी करण्यापेक्षा प्रत्यक्ष समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्या समोरच अशी दयनीय अवस्था असेल,तर शहरातील इतर प्रभागांची परिस्थिती काय असेल,असा सवालही उपलेंचवार यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.
तीन दिवसांचा अल्टिमेटम :
पुतळ्यांसमोरील अतिक्रमणे तातडीने हटवून परिसराची स्वच्छता करण्यात यावी,अशी मागणी करत येत्या तीन दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा सतीश उपलेंचवार यांनी दिला आहे.आता नगर परिषद प्रशासन या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करणार का?,याकडे गडचांदूरवासीयांचे लक्ष लागले आहे.
#Chhatrapati Shivaji Maharaj Statues. #Gadchandur City News. #Encroachments surround the statues of Chhatrapati Shivaji Maharaj.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
