Chandrapur : मागील काही दिवसांत चंद्रपूर शहरात घडलेल्या जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासह दाखल गुन्ह्यांची उकल करण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)विशेष तपासमोहीम राबविली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी विविध पथके गठित करून शहरातील CCTV फुटेजचे बारकाईने विश्लेषण,तांत्रिक तपास तसेच गोपनीय माहितीचे संकलन सुरू केले.
या तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप.क्र. 1004/2026,कलम 304(2),3(5)भारतीय न्याय संहिता (BNS),2023 या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींची ओळख निष्पन्न झाली.या प्रकरणात फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली होती.
घटनेचे व परिसरातील CCTV फुटेज,उपलब्ध तांत्रिक माहिती तसेच गोपनीय बातमीदारांकडून प्राप्त माहितीचे सखोल विश्लेषण केल्यानंतर आरोपींच्या हालचालींबाबत महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली.त्यानुसार LCBची पथके तात्काळ अकोला जिल्ह्यात रवाना करण्यात आली.
दहीहांडा परिसरातून दोन्ही आरोपी ताब्यात :
अकोला जिल्ह्यातील दहीहांडा परिसरात शोधमोहीम राबवून पोलिसांनी—
१) मुस्तफा उर्फ शानू जमील खान(वय ४४),रा.लाल स्कूल, उस्मानिया मदरशाजवळ,मोमीनपुरा,नागपूर.
२) सलमान अब्दुल रेहमान (वय २५),रा.कुरेशीनगर,दहीहांडा, जि.अकोला.
या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान त्यांचा सदर गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला.त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला तसेच गुन्ह्यातून प्राप्त झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
₹३.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त :
आरोपी मुस्तफा उर्फ शानू जमील खान याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल,बजाज पल्सर मोटारसायकल,हेल्मेट,कॉलेज बॅग तसेच गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे असा अंदाजे ₹८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर आरोपी सलमान अब्दुल रेहमान याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल तसेच सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीतून प्राप्त रक्कम व इतर मालमत्ता असा अंदाजे ₹२ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अशाप्रकारे दोन्ही आरोपींकडून एकूण ₹३ लाख १४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तपासात आणखी दोन गुन्ह्यांची उकल :
तपासादरम्यान आरोपी मुस्तफा उर्फ शानू जमील खान याच्याविरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही जबरी चोरी व चोरीसदृश गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.अधिक चौकशी केली असता त्याने नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून सुमारे ३४ तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती दिली.
या माहितीची संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून खातरजमा केली असता सदर घटनेबाबत गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.आरोपीच्या पूर्व गुन्हेगारी इतिहासाचा अधिक तपास सुरू असून,त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
उघडकीस आलेले गुन्हे :
१. रामनगर पोलीस ठाणे,चंद्रपूर
अप.क्र.1004/2026,कलम 304(2),3(5)BNS — जबरी चोरी.
२. रामनगर पोलीस ठाणे,चंद्रपूर
अप.क्र.996/2026,कलम 304(2),3(5)BNS — जबरी चोरी.
३. पाचपावली पोलीस ठाणे,नागपूर शहर.
अप.क्र.489/2026,कलम 331(4),305(अ),3(5)BNS — घरफोडी/चोरी.
अशाप्रकारे चंद्रपूर LCBच्या पथकाने आंतरजिल्हा स्तरावर कौशल्यपूर्ण तपास व शोधमोहीम राबवत दोन जबरी चोरीचे आणि नागपूर शहरातील एक घरफोडीचा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे.
दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कायदेशीर तपासासाठी रामनगर पोलीस ठाणे,चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCBच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली.
CCTV फुटेजचे बारकाईने विश्लेषण,तांत्रिक कौशल्य, गोपनीय माहितीचे संकलन आणि आंतरजिल्हा स्तरावरील शोधमोहीम यांच्या प्रभावी वापरातून LCBने या जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल केली.
#Chandrspur Crime News #Action by LCB Chandrapur.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
