Gadchandur : शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.त्याअनुषंगाने अनेक ठिकाणी भटकी कुत्री पकडून त्यांच्यासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र,अशा केंद्रांमधील प्राण्यांच्या देखभाल,आरोग्य सुविधा आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.पकडलेल्या कुत्र्यांना दीर्घकाळ बंदिस्त ठेवले जात असल्याने त्यांच्या वर्तनात आक्रमकता वाढत असल्याचा दावा काही प्राणीप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर गडचांदूर नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या भटके श्वान निवारा केंद्राची पाहणी भाजप नगरसेवक सुरज पांडे,स्वीकृत नगरसेवक सतीश उपलेंचवार,भाजप शहराध्यक्ष अरविंद डोहे तसेच भाजप कार्यकर्ते जयंत भोंगळे आणि विवेक भेदोडकर यांनी केली.पाहणीदरम्यान उपस्थितांनी काही गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या.त्यांच्या म्हणण्यानुसार,श्वान निवाऱ्याची उंची सुमारे सात फूट असून संपूर्ण संरचना टिन पत्र्याची आहे.निवाऱ्याच्या बाजूंनाही टिन पत्रे आणि लोखंडी जाळी लावण्यात आल्याने नैसर्गिक वायुवीजन अत्यंत मर्यादित आहे.परिसरात सावलीसाठी झाडांची व्यवस्था नसून विद्युत पुरवठ्याअभावी पंखे,कूलर किंवा तापमान नियंत्रणाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
सध्या परिसरातील तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने कुत्र्यांना उष्णतेचा तीव्र त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.तसेच पशुवैद्यकीय तपासणी व उपचारांची नियमित व्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात आला. कुत्र्यांची विष्ठा व इतर घाण वेळेवर साफ केली जात नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचेही निदर्शनास आले.
याशिवाय,श्वान निवारा मंजूर नकाशा आणि तांत्रिक मानकांनुसार उभारण्यात आला नसल्याची चर्चा सुरू असून,काही कुत्रे कुपोषित अवस्थेत असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आल्याचा दावा करण्यात आला.सुमारे २५०० चौरस फूट क्षेत्रातील टीनच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेले अनेक कुत्रे आक्रमक अवस्थेत दिसून आले,तसेच सतत भुंकत असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.या पार्श्वभूमीवर या मुक्या प्राण्यांना किती काळ अशा प्रकारे बंदिस्त ठेवले जाणार,त्यांच्या पुनर्वसनाची किंवा मुक्ततेची काय व्यवस्था आहे,तसेच त्यांच्या आरोग्य आणि देखभालीची जबाबदारी कोणाची आहे,असे विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
सदर परिस्थितीमुळे प्राण्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असून त्यांना अनावश्यक शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.श्वानप्रेमी,पशुसंवर्धन संस्था आणि संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, जेणेकरून या मुक्या जीवांना न्याय मिळू शकेल,अशी मागणी स्वीकृत नगरसेवक सतीश उपलेंचवार व उपस्थितांनी केली आहे.दरम्यान श्वानांच्या देखभालीसाठी ठेवलेल्या व्यक्तीने म्हटले की,या श्वानांची व्यवस्थितपणे देखभाल केली जात आहेत. आता या प्रकरणात पुढे प्रशासन कोणती भूमिका घेते आणि निवारा केंद्रातील परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली जातात,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#Gadchandur Nagarparishad.#News@Shocking News #Stray Dogs issue.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
