Gadchandur : शहर विकासाचे व्हिजन घेऊन सत्ता स्थापन झालेल्या गडचांदूर नगरपरिषदेत एकामागून एक अनपेक्षित प्रकरण समोर येत आहेत.याच पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग(PWD)च्या रस्त्यावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे प्रकरण समोर आले असून सदर बांधकाम नियमबाह्य असल्याचे आरोप करत नगराध्यक्ष निलेश ताजने आणि अभियंता अक्षय पाटील यांनी अधिकार नसताना, सभागृहाला अंधारात ठेवून शासकीय निधीचा अपहार करण्याचा कट रचल्याप्रकरणी यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक तथा गटनेते सतीश बेतावार, स्विकृत सदस्य सतीश उपलेंचवार,सुरज पांडे,हिमांशू नामवाड, सौ.शितल धोटे,सौ.किर्ती वैरागडे,सौ.संगीता गाऊत्रे,सौ.सपना सेलोकर,या नगरसेवकांनी नगरपरिषदचे मुख्याधिकारी (CO), यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार सविस्तर असे की,गडचांदूर नगर परिषद हद्दीतील सा.बा.विभागाच्या मार्ग क्र.13(गडचांदूर,नोकारी, नागापूर,धोंडा अर्जुनी,टेकामांडवा)रस्त्यावर महादेव बोरकर, यांच्या घरासमोर बेकायदेशीरपणे पुलाचे बांधकाम सुरू आहे. सदर प्रकरणी अद्याप शासकीय निधीचा प्रत्यक्ष अपहार झाला नसला तरी,अपहार करण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष,अभियंता व ठेकेदार,यांनी गंभीर स्वरूपाचा कट रचून बेकायदेशीरपणे काम सुरू केला आहे.
'वस्तुस्थिती व कायदेशीर उल्लंघन.'
1)निकडीची परिस्थिती नसताना कलम 58(2)चा गैरवापर : दि. 13/4/2026 रोजी केवळ नगरसेवकांची मागणी आली.तेथील स्थानिक नागरिकांची कोणतीही मागणी नाही."निकडीची परिस्थिती" नसतानाही दि.17/04/2026 रोजी PWD चे ना-हरकत घेऊन त्याच दिवशी कोणताही ठराव,तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी व कार्यादेश नसताना काम सुरू केले.हा महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 च्या कलम 58(2)चे स्पष्टपणे गैरवापर आहे.
2) सभागृहाची दिशाभूल व कलम 81चा भंग : सदर पुलाचे बांधकाम सुरू असताना,त्या दरम्यान दि.30/4/2026 रोजी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली.सदर सभेत लाखोंची कामे प्रत्यक्षात सुरू असतानाही नगराध्यक्ष निलेश ताजने व अभियंता अक्षय पाटील,यांनी जाणीवपूर्वक सभागृहापासून माहिती लपवली.हा महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 च्या कलम 81 चा भंग आहे.
3) PWD च्या परवानगीतील अटींचा भंग : सदर रस्ता जिवती तालुक्याकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग असून 24 तास वाहतूक सुरू असते.PWD ने दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रातील अट क्र. 2,उपरोक्त बांधकाम सा.बा.विभागाच्या मानांकित तपशील प्रमाणे करण्यात यावे" या अटीचा पूर्णपणे भंग करण्यात आला आहे.
4) संपूर्ण प्रक्रिया डावलून अपहाराचा प्रयत्न : सतत काम सुरू असूनही कामाचा कोणताही ठराव नाही,तांत्रिक मंजुरी नाही, प्रशासकीय मंजुरी नाही,CO यांची टिपणी नाही,कार्यादेश नाही. असे असताना नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्य व बेकातदेशीरपणे आपल्या निकटवर्तीय ठेकेदाराला आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने नगर परिषदेच्या निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न केला असून अभियंत्याने त्यास सहकार्य केले आहे.हा महाराष्ट्र नगर परिषद लेखा संहिता नियमाचे भंग केले आहे.
5) काम चालू केल्याची तारीख व अभियंत्याच्या टिपनणीच्या तारखेचा घोळ : दि.17/04/2026 रोजी पुलाचे काम सुरू व दि. 21/04/2026 रोजी न.प.च्या अभियंताची टिपणी,सदरचे काम करणे गरजेचे असल्याचे परंतु,प्रत्यक्षात 5 दिवसापूर्वी काम सुरू.
सदर पुल बांधकाम बेकायदेशीर असल्याने ठेकेदाराला बिल अदा करू नये.नगराध्यक्ष निलेश ताजने,अभियंता अक्षय पाटीलविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 61,62,198,318,329 (3)व भ्रष्टाचार प्रतिबंधकीय कायदा 1988 चे कलम 13(1)(d) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा.कार्यादेशाविना सरकारी रस्ता खोदून काम करणाऱ्या संबंधीत ठेकेदाराचा परवाना तात्काळ काळ्या यादीत टाकून,त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी.अभियंता अक्षय पाटील,यांना तात्काळ निलंबित करावा. अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी सर्व पुराव्यांसह मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.15 दिवसांत यांच्यावर फौजदारी कारवाई न झाल्यास,शासकय निधीचे संरक्षण व न्याय मिळविण्यासाठी मा.उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ,येथे जनहित याचिका दाखल करण्याचे म्हटले आहे. संचालक नगर परिषद संचानलायलय मुंबई,जिल्हाधिकारी चंद्रपूर,पोलीस अधीक्षक चंद्रपूर,पोलीस उपअधीक्षक ACB चंद्रपूर,उपकार्यकारी अभियंता सा.बां.विभाग गडचांदूर,आमदार देवरावदादा भोंगळे,यांनाही निवेदन पाठवण्यात आल्याची माहिती आहे.आता याप्रकरणात पुढे काय घडते याकडे लक्ष लागले आहे.सदर प्रकरणी नगराध्यक्ष यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दुपारी साडे अकराच्या दरम्यान दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला.मात्र,मिटींग सुरू आहे,नंतर बोलतो,असे सांगण्यात आले.त्यानंतर संपर्क झालेला नाही.
#Shocking News.#Gadchandur Nagarparishad.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
