Smart Electricity Meter : स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घ्या; त्रस्त वीज ग्राहकांची महावितरण कार्यालयावर धडक! Marathi News.

News@Smart Meter...

   Gadchandur : स्मार्ट मीटर बसविण्याबाबत महावितरणकडून ग्राहकांना एसएमएस आणि व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात आलेल्या सूचनांविरोधात गडचांदूर शहरातील वीज ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ थांबवावी आणि ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवू नयेत,या मागणीसाठी १५ जून रोजी नागरिकांनी महावितरणच्या स्थानिक कार्यालयावर धडक देत उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर केले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,शासनाच्या १८ ऑगस्ट २०२१ रोजीच्या अधिसूचनेत स्मार्ट मीटर बसविण्याचे उद्दिष्ट नमूद असले तरी कोणत्याही ग्राहकावर सक्ती करण्याचा अधिकार त्यामधून दिलेला नाही.तसेच,ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

   ग्राहकांचे सध्या कार्यरत असलेले मीटर सुस्थितीत असून,विद्युत कायदा २००३ मधील तरतुदींनुसार कार्यरत मीटर बदलणे बंधनकारक नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच,स्मार्ट मीटर बसविण्याबाबत केवळ ४८ तासांची मुदत देण्यात येत असल्याबद्दलही आक्षेप नोंदविण्यात आला असून, नियमानुसार अधिक कालावधीची नोटीस अपेक्षित असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

        स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात वाढ झाल्याच्या तक्रारी विविध ठिकाणी समोर येत असल्याचा उल्लेख करत ग्राहकांनी या योजनेबाबत सखोल पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय अथवा मागणीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

         यावेळी विक्रम येरणे,हंसराज चौधरी,सतीश बिडकर,प्रकाश बोरकर,राहुल बोरकर,सिद्धेश्वर केंद्रे,विवेक येरणे,दिलीप चव्हाण, रोहन काकडे,धनंजय छाजड,मनोज भोजेकर,प्रवीण मेश्राम, संतोष महाडोळे,मनोहर सातपुते,अक्षय गोरे,दिनेश माथुलकर, प्रा.कीर्तीकुमार करमनकर,महादेव कळसकर,अनंता रासेकर, दिलीप झुलुरवार,यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

दरम्यान,शहरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक आधीच त्रस्त असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढल्याचे दिसून येत आहे. आता या निवेदनावर महावितरण प्रशासन कोणती भूमिका घेते आणि ग्राहकांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेतला जातो,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#Gadchnadur City Smart Electricity Meter case.

                      $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$