Chandrapur : फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून बनावट कर्ज मंजुरी पत्रांच्या माध्यमातून लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपीला चंद्रपूर सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या काही दिवसांत ही कारवाई करण्यात आली.
बाबुपेठ येथील तक्रारदार हे हार्वेस्टर मशीन विक्रीचा व्यवसाय करतात.त्यांच्या ग्राहकांना हार्वेस्टर खरेदीसाठी कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांना हेमंत जोशी नावाच्या व्यक्तीचा संपर्क मिळाला.संबंधित व्यक्तीने स्वतःला पुणावाला फिनकॉर्प लिमिटेड,नागपूरचा कर्मचारी असल्याचे सांगत दोन ग्राहकांशी संपर्क साधला.त्यांच्या घरी जाऊन कर्जासंदर्भातील बनावट करारपत्रे तयार करण्यात आली.
त्यानंतर तक्रारदाराच्या व्हॉट्सॲपवर १५ लाख रुपयांचे बनावट कर्ज मंजुरी पत्र (Loan Sanction Letter)पाठविण्यात आले.कर्ज वितरणासाठी डाऊन पेमेंट म्हणून ४ लाख ४६ हजार २५० रुपये ‘वृषभ ईखार,जनरल मॅनेजर,पुणावाला फिनकॉर्प लिमिटेड’ या नावाच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराने १६ मे २०२६ रोजी आयएमपीएसद्वारे संबंधित खात्यात रक्कम वर्ग केली.
रक्कम जमा झाल्यानंतर आरोपीने १८ मे रोजी कर्ज वितरण आणि हार्वेस्टर मशीन डिलिव्हरीसंदर्भातील बनावट मंजुरी पत्र व ई-मेल पाठविले.मात्र,१९ मेपासून आरोपीचा मोबाईल क्रमांक बंद लागल्याने संशय निर्माण झाला.तक्रारदाराने पुणावाला फिनकॉर्पच्या नागपूर कार्यालयात चौकशी केली असता ‘हेमंत जोशी’ नावाचा कोणताही कर्मचारी कार्यरत नसल्याचे समोर आले.तसेच सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
फसवणुकीची खात्री झाल्यानंतर तक्रारदाराने राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातही फिर्याद दिली.त्यावरून शहर पोलिसांनी ३ जून २०२६ रोजी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड)तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) व ३१८(४)अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सायबर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला.सखोल तांत्रिक तपासानंतर आरोपी विनोद शांताराम गडाख पाटील(वय ४४)रा.बाणेर,पुणे याचा शोध घेऊन त्याला १७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरातून अटक करण्यात आली.आणि १८ जून रोजी चंद्रपूर न्यायालयात हजर करण्यात आले.
प्राथमिक तपासात आरोपीने महाराष्ट्र,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश आणि गुजरातमधील अनेक नागरिकांची वेगवेगळ्या नावांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.हेमंत जोशी,हेमंत पवार, रणवीर सिंग सिकरवार,राम हरीचंद,मयंक वानखेडे,अभिषेक शर्मा जितेंद्र श्रीवास्तव,निखिल यादव,विठ्ठल पाटील आणि विनोद पाटील अशा विविध नावांचा वापर करून तो लोकांना जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले आहे.
न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तपासादरम्यान भारतीय न्याय संहितेतील अन्य गंभीर कलमांचीही भर घालण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस करत आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात सायबर पोलीस व शहर पोलीसांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
'नागरिकांना आवाहन.'
कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून कर्ज मंजुरीचे आमिष दाखविण्यात आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये.संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनीच्या अधिकृत कार्यालयात प्रत्यक्ष चौकशी करूनच व्यवहार करावेत.कोणत्याही खात्यात रक्कम जमा करण्यापूर्वी खातरजमा करावी.ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा.
#Online fraud Case.#Major action by Chandrapur Cyber Police.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
