Gadchandur: मुक्तीधाम(स्मशानभूमी)हे नागरिकांच्या भावनांशी निगडित अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे.अशा ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव,अस्वच्छता किंवा प्रशासकीय दुर्लक्ष असल्यास अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या शोकाकुल कुटुंबियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.सध्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील मुक्तीधाम परिसरात अशाच काही गंभीर समस्या निर्माण झाल्या असून,त्या तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर नगरपरिषद, येथील विरोधी पक्ष भाजपाचे गटनेते तथा नगरसेवक सतीश बेतावार,यांनी नगराध्यक्ष निलेश ताजने,यांना निवेदन देत मुक्तीधामातील विविध समस्यांकडे त्वरित लक्ष देऊन आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी केली आहे.
'नेमक्या समस्या काय?'
बेतावार यांनी दिलेल्या निवेदनानुसार,मुक्तीधाम परिसरातील अनेक संरक्षक कठडे मोडकळीस आले असून काही ठिकाणी ते तुटलेल्या अवस्थेत आहेत.तसेच अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेले छप्परही जीर्ण झाले असून त्याची अवस्था धोकादायक बनली आहे.यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गळक्या छतामुळे नागरिकांना उघड्यावर उभे राहण्याची वेळ येऊ शकते.याशिवाय मोडकळीस आलेल्या संरचनेमुळे अपघाताचा धोका कायम असल्याने तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
'तातडीच्या कारवाईची मागणी.'
स्मशानभूमी ही केवळ एक जागा नसून ती नागरिकांच्या भावनांशी जोडलेली अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक सुविधा आहे. अशा ठिकाणच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होणे खेदजनक असल्याचे मत व्यक्त करत बेतावार यांनी नगराध्यक्षांनी या गंभीर विषयात विशेष लक्ष घालावे व संबंधित विभागाला त्वरित दुरुस्तीचे आदेश द्यावेत,अशी मागणी केली आहे.स्थानिक नागरिकांनीही या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, "दुर्घटना घडण्याआधी प्रशासनाने जागे व्हावे" अशी भावना व्यक्त केली जात आहे.आता मुक्तीधामातील कठडे व छप्पर दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होणार आणि या समस्यांपासून नागरिकांना केव्हा मुक्ती मिळणार,याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
#Gadchandur Muktidham News.#Nagarparishad Gadchandur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
