Chandrapur : जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू,गुटखा आणि पान मसाला,या अवैध व्यवसायद्वारे युवा पिढीला कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या विळख्यात ढकलणाऱ्या तंबाखू माफियांविरुद्ध चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे.संघटित गुन्हेगारीविरोधातील कठोर कायद्यांतर्गत ‘मिनी मकोका’ (कलम 111) लागू करत पोलिसांनी दोन संघटित टोळ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,या कारवाईने जिल्ह्यातील तंबाखू माफियांचे धाबे दणाणले आहे. महाराष्ट्र शासनाने जुलै 2012 मध्ये गुटखा,पान मसाला आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन,साठवणूक,विक्री व वितरणावर बंदी लागू केली होती.या बंदीला न्यायालयीन मान्यताही मिळाली आहे.मात्र,गेल्या अनेक वर्षांपासून इतर राज्यांतून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी सुरूच असून,या अवैध व्यवसायात सहभागी असलेल्या अनेक टोळ्यांवर सातत्याने कारवाया होऊनही त्यांचे जाळे संपुष्टात आले नव्हते.चंद्रपूर पोलिसांनी केलेल्या या कठोर कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा व सुगंधित तंबाखू तस्करीला मोठा आळा बसणार का? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तपासादरम्यान रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील टोळी प्रमुख वसीम अख्तर झिमरी (रा.घुटकाळा वॉर्ड,चंद्रपूर),सिद्धांत माधव गोंडाणे,मोहम्मद अखिल शकील शेख तसेच बल्लारपूर येथील टोळी प्रमुख जयसुखलाल अंबाराम ठक्कर आणि अजयकुमार विजयकुमार गुंडोजवार यांच्याविरुद्ध यापूर्वीही प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाल्याच्या अवैध व्यापारासंदर्भात अनेक गुन्हे नोंद असल्याचे समोर आले.तपासात आरोपी आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध चंद्रपूर,वर्धा,गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.आर्थिक फायद्यासाठी संघटित पद्धतीने सातत्याने गुन्हे केल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रणाशी संबंधित कलम 111 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
दरम्यान,या प्रकरणातील आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात तपास अधिकारी पोउपनि.हिराचंद गव्हारे व सपोनि.सचिन राखोंडे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.चंद्रपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई प्रतिबंधित तंबाखू व्यापाराविरोधातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून,संघटित गुन्हेगारी विरोधातील अशा कठोर उपाययोजनांमुळे भविष्यात अशा टोळ्यांवर प्रभावी प्रतिबंध निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#Chandrapur Gutkha Mafia.
#Chandrapur District Crime News.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
