Chandrapur : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन लाठी हद्दीतील सोनापूर येथे नुकत्याच घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा(LCB) चंद्रपूर व लाठी पोलीसांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपीला तेलंगणा राज्यातून ताब्यात घेण्यात आले असून,त्याच्याकडून आणखी दोन घरफोडीचे गुन्हे सुद्धा उघडकीस आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार,सोनापूर येथील घरफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.आधुनिक तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी तेलंगणात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांचे विशेष पथक तातडीने तेलंगणात रवाना करण्यात आले.या कारवाईदरम्यान आशिष जानकीराम चौधरी (वय २६),रा.सोनापूर देशपांडे,ता.गोंडपिपरी याला ताब्यात घेऊन गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला.आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने आणखी दोन घरफोडीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली.
'जप्त मुद्देमाल'
१) पोलीस स्टेशन लाठी,अपराध क्र.४२/२०२६ कलम ३०५(अ), ३३१(४) बीएनएस अंतर्गत दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रकमेपैकी १ लाख ६३ हजार २५० रुपये रोख तसेच चोरीच्या पैशातून खरेदी केलेले १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ७८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२) पोलीस स्टेशन गोंडपिपरी,अपराध क्र.२५२/२०२४ कलम३०३ (२)बीएनएस अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीकडे आढळून आलेली मोटारसायकल ही गोंडपिपरी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी लाठी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून,प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या पथकात सपोनि.दीपक काँक्रेटवार, सपोनि.बलराम झाडोकार,सफौ.स्वामीदास चालेकर,पोहवा. अजय बागेसर,पोअं.गोपीनाथ नरोटे,शेखर माथनकर,चापोअं. ऋषभ बारसिंगे तसेच लाठी पोलीस स्टेशनचे पोहवा.अशोक मंजुळकर यांचा सहभाग होता.घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा २४ तासांत छडा लावून आरोपीला तेलंगणातून अटक करण्यात आल्याने पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी तपासकार्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
#Chandrapur District Crime News.#Action by LCB Chandrapur.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
