Chandrapur ACB Raid : दुय्यम निबंधक आणि कॉम्प्युटर ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात; 4 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात कारवाई!| Marathi News.

News@Crime...

          Chandrapur : चंद्रपूर येथील नोंदणी व मुद्रांक विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)धडक कारवाई करत दुय्यम निबंधक आणि कॉम्प्युटर ऑपरेटरला 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.सदर कारवाई  16 जून रोजी करण्यात आली असून,या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार,मुद्रांक व नोंदणी विभागातील दुय्यम निबंधक मोहन चंद्रकांत शेट्टीवार यांनी तक्रारदाराच्या पक्षकारांच्या मालमत्तेच्या दोन नोंदणी प्रकरणांसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये,अशी एकूण 4 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.ही रक्कम थेट स्वीकारण्याऐवजी कार्यालयातील कॉम्प्युटर ऑपरेटरमार्फत घेतली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

तक्रारदाराने याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याने ACB च्या पथकाने कार्यालयात सापळा रचला.त्यानुसार कॉम्प्युटर ऑपरेटरने लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे नोंदणी कार्यालयातील व्यवहारांच्या पारदर्शकते बाबत प्रश्न उपस्थित होत असून,मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत नियमितपणे अशा प्रकारची अवैध वसुली केली जात होती का, याचाही तपास सुरू आहे.या प्रकरणा मागे आणखी कोणी संबंधित आहे का,याचा शोधही तपास यंत्रणा घेत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार,पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

                          'नागरिकांना एसीबीतर्फे आवाहन'

कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे आवाहन ACB तर्फे करण्यात आले आहे.

#Crime News.#ACB Raid in Chandrapur.

                     $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$