Awarpur Ultratech Cement and Workeres : आवारपूर अल्ट्राटेक सिमेंट प्रकल्पात कामगारांमध्ये वाढता असंतोष?|Marathi News.

News@Dissatisfaction...

        Chandrapur : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंटच्या आवारपूर प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून ठेकेदारी कामगारां मध्ये असंतोष वाढत असल्याची चर्चा कामगार वर्तुळात सुरू आहे.कंपनी उत्पादन आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती करत असताना दुसरीकडे ठेकेदारी कामगारांमध्ये असुरक्षितता,कथित भेदभाव आणि काही प्रशासकीय निर्णयांविषयी नाराजी वाढत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

कामगारांच्या माहितीनुसार,मागील ३ ते ४ वर्षांपासून प्रकल्पात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे.व्यवस्थापनाकडून दडपशाहीची वागणूक दिली जात असल्याचा आरोप काही कामगारांनी केला असून,कामगारांमध्ये फूट पडेल अशा पद्धतीने धोरणे राबविली जात असल्याची भावना देखील व्यक्त केली जात आहे.

  दोन महिन्यांपूर्वी विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ३० ठेकेदारी कामगारांच्या वेतनात प्रतिदिन ५० ते १५० रुपयां पर्यंत वाढ करण्यात आल्याचे सांगितले जाते.मात्र,ही वाढ कोणते निकष लावून करण्यात आली, याबाबत स्पष्टता नसल्याचा दावा काही कामगारांनी केला आहे.परिणामी काही कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला असला तरी अनेक जण वंचित राहिल्याने कामगारांमध्ये मतभेद आणि नाराजी वाढल्याची चर्चा आहे.

  याच पार्श्वभूमीवर अनेक ठेकेदारी कामगार पुन्हा जुन्या कामगार संघटनांकडे वळत असल्याचे समजते.आपल्या विविध प्रश्नांसाठी संघटित होण्याचे प्रयत्न सुरू असून,कामगारांच्या मागण्यांबाबत भूमिका मांडण्यासाठी कामगार नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांची आवारपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती कामगार वर्तुळातून पुढे येत आहे.

दरम्यान,ठेकेदारी कामगारांना २ गणवेशांच्या शिवण खर्चासाठी ९०० रुपये देण्यात आल्याचे सांगितले जाते.मात्र,संबंधित टेलर्स किंवा मध्यस्थांमार्फत काही कामगारांकडून अतिरिक्त ३०० रुपये आकारण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी,अशी मागणी संबंधित कामगारांनी केली आहे.

कंपनीच्या शाळेच्या शुल्कवाढी बाबतही काही पालकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.कामगारांच्या म्हणण्यानुसार, शाळेचे वार्षिक शुल्क सन २०२३-२४ मध्ये सुमारे ६ हजार रुपये होते.त्यानंतर ते ११ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले असून चालू शैक्षणिक वर्षात ते सुमारे १७ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात येत आहे.ही रक्कम थेट वेतनातून कपात केली जाणार असल्याचे सांगितले जात असून,शुल्क वाढीबाबत पालकांशी पुरेसा संवाद साधला गेला नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.अल्प वेतनावर कार्यरत असलेल्या कामगारांसाठी ही वाढ आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरत असल्याचेही काही पालकांचे म्हणणे आहे.

    याशिवाय उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहनपर लाभांमध्ये कपात करण्यात आल्याची तक्रारही काही कामगारांनी केली आहे.अनेक वर्षांपासून मिळणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेचे प्रमाण कमी झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे.एकूणच वेतनवाढीतील कथित असमानता,ठेकेदारी कामगारांचे विविध प्रश्न,शैक्षणिक शुल्कवाढ,प्रोत्साहनपर लाभांमधील बदल आणि व्यवस्थापनावरील विविध आरोप यामुळे आवारपूर प्रकल्पातील वातावरण चर्चेचा विषय बनले आहे.या सर्व मुद्द्यांवर कंपनी व्यवस्थापनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करून कामगारांशी संवाद साधावा,अशी अपेक्षा संबंधित कामगारांकडून व्यक्त केली जात आहे.

#Dissatisfaction. #Awarpur Ultratech Cement and Workeres.

                           $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$