Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी,येथे पुन्हा एकदा आपले आमरण उपोषण सुरू केले आहे.मराठा आरक्षणाच्या मुख्य मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (30 मे)सकाळी 10 वाजल्यापासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आपले आमरण उपोषण सुरू केले आहे.मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात त्यांनी गावातील मोकळ्या मैदानावर एका बाजवर (Cot)बसून आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.आंदोलन स्थळी कोणतीही गडबड किंवा गोंधळ होऊ नये,यासाठी मनोज जरांगे यांनी एक आगळावेगळा पवित्रा घेतला आहे.त्यांनी उपस्थित मराठा आंदोलकांना हातात काठी घेऊन आंदोलन स्थळापासून एका निश्चित अंतरावर शिस्तीत बसण्याचे आवाहन केले आहे.आंदोलनातील शिस्त राखण्यासाठी जरांगे पाटील यांनी स्वतः काठीने जमिनीवर एक रेषा ओढून दिली.या रेषेच्या पलीकडेच आंदोलकांनी आणि सहकाऱ्यांनी बसावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने काल (29 मे)आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील, यांची भेट घेतली होती.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांना जरांगे यांची मनधरणी करण्यात अपयश आले.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जरांगे पाटील यांच्यात काल रात्री जवळपास दीड तास सविस्तर चर्चा झाली.या बैठकीत विखे पाटलांनी सरकार सकारात्मक असल्याचे सांगत जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र,जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.दीड तासांच्या चर्चेदरम्यान मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेट आणि सगेसोयऱ्यांच्या कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून मंत्री विखे पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.दोन्ही बाजूंकडून प्रदीर्घ चर्चा होऊनही कालच्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही.आता मनोज जरांगे हे आजपासून उपोषणाला बसले आहेत.पुढे काय घडते?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
#Manoj Jarange Patil.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
