Gadchandur : नववर्षाच्या शेवटच्या दिवशी कुरखेडा शहरात घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे.पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा निघृण खून करून अपघाताचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली.या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,देवानंद सूर्यभान डोंगरावर वयवर्ष 33 रा.गेवर्धा,याचा काही वर्षांपूर्वी रेखा वयवर्ष 28, हिच्यासोबत विवाह झाला होता.दोघे कुरखेडा शहरातील प्रताप वॉर्ड येथे एका ठिकाणी किरायच्या खोलीत वास्तव्यास होते.विवाहानंतर यांच्यामध्ये सतत वाद होत असल्याचे कळते.दरम्यान रेखा हिचे विश्वा सांगोळे वयवर्ष 25 रा.भरनुली,याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.30 डिसेंबर रोजी रात्री पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले.यातूनच पत्नी रेखाने प्रियकर विश्वाच्या मदतीने एका धारदार शस्त्राने पती देवानंदची निर्घृण हत्या केली.
हत्येनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दुचाकीवरून सती नदी पुलाजवळ नेऊन टाकला.त्याच ठिकाणी दुचाकी पाडून,अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आला.मात्र,मृतदेह नेण्यात आलेल्या मार्गावर आढळलेले रक्ताचे डाग,घटनास्थळी मिळालेले पुरावे व संशयास्पद परिस्थितीमुळे पोलिसांचा संशय बळावला.शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यू हा अपघाती नसून पूर्वनियोजित झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत सदर हत्तेत पत्नी व तिच्या प्रियकराचा सहभाग उघडकीस आणला.यानंतर कुरखेडा पोलिसांनी प्रताप वॉर्ड येथे जाऊन आरोपी पत्नी रेखा व तिचा प्रियकर विश्वा,यांना ताब्यात घेतले.पोलीस चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे.या धक्कादायक हत्याकांडाने नववर्षाच्या आनंदाऐवजी कुरखेडा शहरात शोककळा पसरली असून सदर प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
#Murder in Gadchiroli District.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
