Chandrapur : बँक कर्मचारी असल्याचे भासवून मोबाईलवर बनावट APK फाईल पाठवत बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून 5 लाख 43 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud)करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर आरोपीला चंद्रपूर सायबर पोलिसांच्या विशेष पथकाने पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून अटक केली.अंगद सुरज प्रजापती (वय 21,रा. कोलकाता),असे आरोपीचे नाव आहे.तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर 7 नोव्हेंबर 2026 रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्या न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणातील 58 वर्षीय शालेय मुख्याध्यापिकेने 30 ऑगस्ट 2026 रोजी ॲक्सिस बँकेच्या एटीटीएम(ATM)मधून 5 हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता,त्यांना 900 रुपये कमी मिळाले.याबाबत त्यांनी बँकेत तक्रार नोंदवली होती.त्यानंतर एका अनोळखी मोबाईल नंबरवरून त्यांना फोन आला.समोरील व्यक्तीने स्वतःला बँक कर्मचारी असल्याचे सांगत एटीएममधून 900 रुपये कमी मिळाल्याची विचारणा केली आणि विश्वास संपादन केला.यानंतर आरोपीने व्हॉट्सॲपवर बनावट APK फाईल पाठवून,ती डाऊनलोड करण्यास सांगितली.त्यामध्ये एटीएम पिन आणि सीव्हीव्ही(CVV)नंबर भरून घेत विविध ऑनलाईन व्यवहारांद्वारे खात्यातील 5 लाख 43 हजार रुपये परस्पर वळवून फसवणूक केली.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे,चंद्रपूर येथे अपराध क्रं.006/ 2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318 (4),319(2),61(2),3(5),तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 66(क),66(ड),अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
'कोलकात्यात चार दिवस शोधमोहीम' :
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि.निलेश गिरी, पोलीस अंमलदार राहूल पोंदे,अनिमेश भोंगळे आणि पंकज बावणे यांचे विशेष पथक कोलकाता येथे रवाना केले.स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग चार दिवस अहोरात्र शोधमोहीम राबवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अंगद सुरज प्रजापती,याला उल्टाडांगा पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेण्यात आले.आरोपीला चंद्रपूर येथे आणल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली.
चौकशीदरम्यान त्याच्याकडून इतर साथीदार व फसवणुकीच्या नेटवर्कबाबत माहिती घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर त्याची चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
#Online Fraud Case. #Chandrapur Police. #Crime News.

