Chandrapur : चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी,बेरोजगार युवक,कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी 6 नोव्हेंबर रोजी भद्रावती येथे निप्पॉन डेंड्रो कंपनी विरोधात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 'दिवे लावा व काळे झेंडे दाखवा' आंदोलन करण्यात आले.यावेळी कंपनी व्यवस्थापन व शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
आमदार बच्चू कडू यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्यास गनिमी काव्याने कंपनीत घुसण्याचा आणि न्याय मिळेपर्यंत कंपनीचे कामकाज सुरू होऊ न देण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणे सहन केले जाणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड.दीपक चटप यांनी शासन व लोकप्रतिनिधींवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास मंत्री आणि लोकप्रतिनिधींना गावबंदी व जिल्हाबंदी करण्याचा इशारा दिला.तसेच न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढ्यात शेतकऱ्यांच्या सोबत राहण्याची ग्वाही दिली.मुकेश जीवतोडे यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी,बेरोजगार युवक व कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन केले.
'आंदोलनातील प्रमुख मागण्या' :
1) सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 30 लाख रुपये मोबदला व प्रति हेक्टर एक नोकरी द्यावी.
2) स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्रकल्पांमध्ये प्राधान्याने रोजगार द्यावा.
3) शेतीसाठी 24 तास वीज व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे.
4) औद्योगिक प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवावे.
5) कामगारांना योग्य वेतन,सुरक्षितता व कायदेशीर हक्क द्यावेत.
6) कामगारांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणात कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत द्यावी.
1994 पासून जमिनी संपादित होऊनही प्रकल्पग्रस्तांचे मोबदला पुनर्वसन व रोजगाराचे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.शासन,प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाने तातडीने बैठक घेऊन मागण्यांवर लेखी निर्णय द्यावा,अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आंदोलनाला निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष प्रवीण सातपुते,मधुकर सावंतकर,बंडू भादेकर,विनोद उपरे,सुनील गोवार,दीपे तेजकरण,सुरेश बदकल,दिलीप चौधरी,यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी,कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि.अनुप सुधाकर कुटेमाटे, संचालन चेतन गुंडावार तर आभार संदीप कुटेमिटे यांनी व्यक्त केले.
#Bachchu Kadu's warning.If we don't get justice,we will infiltrate the company with guertilla poetry!

