Chandrapur : बार अँड रेस्टॉरंटच्या बांधकामासाठी ग्राम पंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र(NOC)देण्याच्या मोबदल्यात 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर 3 लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी आणि पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB)पथकाने रंगेहात पकडले.गुरुवार(6 नोव्हेंबर) रोजी मौजा खांबाळा येथे,ही सापळा कारवाई करण्यात आली. पांडुरंग निलकंठ पेंदे(वय 48),ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत नागरी,ता.वरोरा आणि प्रणव सुधाकर बक्षी(वय 51)विस्तार अधिकारी पंचायत समिती वरोरा,अशी ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार,37 वर्षीय तक्रारदार व त्याच्या भावाच्या नावे असलेल्या शेतात बार अँड रेस्टॉरंटचे बांधकाम प्रस्तावित होते. त्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते.हे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग पेंदे यांनी स्वतःसह वरिष्ठ अधिकारी प्रणव बक्षी,यांच्यासाठी तक्रारदाराकडे 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 2 नोव्हेंबर 2026 रोजी चंद्रपूर ACB कार्यालयात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने ACB पथकाने 4 व 5 नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली.यावेळी आनंदवन चौक,वरोरा तसेच पंचायत समिती कार्यालयात झालेल्या पडताळणीत सुरुवातीला 5 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपींनी तडजोडीअंती 3 लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी ACB ने मौजा खांबाळा येथे सापळा रचला.ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग पेंदे यांनी तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताच ACBच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.या प्रकरणात विस्तार अधिकारी प्रणव बक्षी यांनाही ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(ACB)नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर ACBचे चे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार,पोलीस निरीक्षक तेजराम मेश्राम आणि त्यांच्या पथकाने केली.याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'लाच मागितल्यास १०६४ वर तक्रार करा' :
दरम्यान,कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.यासाठी ACBच्या चंद्रपूर कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा टोल फ्री नंबर 1064 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.
ACB Raid. #Chandrapur District Crime News.

