Padshi-Bharadi (Taluka Sillod) : बैल पोळ्याच्या सणानिमित्त बैल धुण्यासाठी तळ्यावर गेलेल्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या संदीप संजय गोरे (वय 15),या विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 10 सप्टेंबर गूरुवार रोजी दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास घडली.ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने भराडी गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,संदीप गोरे हा त्याचे काका विजय गोरे व चुलत भाऊ विशाल गोरे यांच्यासोबत बैल धुण्यासाठी तळ्यावर गेला होता.बैल धुत असताना संदीप तळ्यातील गाळात फसत गेला आणि पाण्यात बुडाला.
घटना लक्षात येताच गावातील 4 ते 5 नागरिकांनी तातडीने तळ्यात उतरून संदीपचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र, तळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत होते.बराच वेळ शोध घेऊनही संदीपचा ठावठिकाणा लागत नसल्याने रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले.
रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली.सुमारे 30 ते 40 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर संदीपचा शोध घेण्यात यश आले.मात्र,तोपर्यंत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
पोळ्याच्या आनंदावर शोककळा :
बैल पोळ्याच्या सणानिमित्त संदीप मोठ्या उत्साहात बैलांना रंग लावत होता.मात्र,बैल धुण्यासाठी तळ्यावर गेलेल्या संदीपवर काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.या घटनेमुळे पोळ्याच्या सणाचा आनंद शोकात बदलला.
संदीपचे वडील संजय गोरे यांनी भावुक होत सांगितले, “पोळा असल्याने संदीप मोठ्या हौशीत बैलांना रंग लावत होता.आपला बैल चांगला दिसावा यासाठी तो मेहनत घेत होता.बैल धुण्यासाठी तो तळ्यावर गेला आणि ही दुर्दैवी घटना घडली.”
संदीपच्या पश्चात आई-वडील,दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.त्याच्यावर गुरुवारी सायंकाळी सुमारे 6 वाजता पिरोळा फाटा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने नातेवाईक,मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
#Shocking News #Marathi News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
