Shocking incident : गौरी विसर्जनाला मधमाशांचा ‘डंख’; सावलीत ८ महिला जखमी,कोठारीतही थरार!| Marathi News.

News@Shocking...

              Chandrapur : गौरी विसर्जनासाठी तलाव व नाल्याच्या परिसरात गेलेल्या महिलांवर मधमाशांच्या मोठ्या थव्याने अचानक हल्ला केल्याच्या 2 घटना मंगळवारी सकाळी घडल्या. सावली येथील गाव तलाव परिसरातील हल्ल्यात आठ महिला जखमी झाल्या,तर कोठारी परिसरातही अनेक महिलांना मधमाशांनी दंश केला.अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गौरी विसर्जनाचा विधी अर्धवट सोडून महिलांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली.

        सावली येथील गाव तलावावर सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास गौरी विसर्जनासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.तलावाच्या पाळीवर असलेल्या वडाच्या झाडावर मधमाशांचे मोठे मोहळ होते.अचानक या मोहळातून मधमाशांचा थवा बाहेर पडला आणि उपस्थित महिलांवर हल्ला केला.

       काही क्षणांतच परिसरात आरडाओरड आणि गोंधळ उडाला. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी मिळेल त्या दिशेने धाव घेत सुरक्षित ठिकाण गाठण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यात वर्षा कोसरे,छाया कोसरे,रुपाली कोसरे,शीतल कोसरे यांच्यासह जवळपास 8 महिला जखमी झाल्या.जखमी महिलांवर स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले.हल्ल्यामुळे झालेल्या गोंधळात रुपाली कोसरे यांचा सोन्याचा दागिना हरवल्याची माहिती असून तो नेमका कुठे पडला याचा शोध घेतला जात आहे.

कोठारीतही मधमाशांचा थवा महिलांवर तुटून पडला :

  दरम्यान,कोठारी परिसरातही गावालगतच्या नाल्याजवळ गौरी विसर्जनासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांच्या मोठ्या थव्याने अचानक हल्ला केला.गौरी पूजनानंतर पारंपरिक पद्धतीने विसर्जनाचा विधी सुरू असतानाच मधमाशा महिलांच्या दिशेने आल्या आणि काही क्षणांतच त्यांनी महिलांना दंश करण्यास सुरुवात केली.

    अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.बचावासाठी महिलांनी आरडाओरड करत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.काही महिलांनी नाल्यातील गौरी तशाच सोडून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला.या घटनेत अनेक महिलांना मधमाशांनी दंश केल्याने त्यांना उपचारासाठी नेण्यात आले.

विसर्जनस्थळी खबरदारी घेण्याची गरज :

गौरी विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असलेल्या तलाव,नाले आणि सार्वजनिक विसर्जनस्थळांच्या परिसरात मधमाशांचे मोठे मोहळ असल्यास आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.अशा ठिकाणी असलेली धोकादायक मोहळे वेळीच हटवून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

#Shocking incident. #Chandrapur District News.

                          ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢