MNS aggressive‌ : 'त्या' कामांची चौकशी व दोषींवर कारवाई करा’; जिवतीत मनसे आक्रमक!| Marathi News.

News@MNS...

Jivati MNS : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय) अंतर्गत सन २०२६ मध्ये जिवती तालुक्यात करण्यात आलेल्या माती नाला बांध व अनगड दगडी बांधांच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.या कामांची विभागीय चौकशी करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी,अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना,जिवती तालुकाध्यक्ष हकानी शेख यांनी जिल्हा कृषी अधीक्षक,चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हकानी शेख यांनी दिलेल्या निवेदनानुसार,याच प्रकरणासंदर्भात २४ ऑगस्ट २०२६ रोजी तालुका कृषी अधिकारी,जिवती यांच्याकडे सविस्तर निवेदनात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतरही संबंधित प्रकरणाची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप करीत ३१ ऑगस्ट रोजी स्मरणपत्र देण्यात आले.संबंधित कामांची चौकशी करून करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल देण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र,अद्याप कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई झालेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

‘आर्थिक अनियमिततेचा संशय’ :

कामांच्या दर्जाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांमुळे संबंधित माती नाला बांध व अनगड दगडी बांधांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता किंवा भ्रष्टाचार झाला असण्याचा संशय निर्माण झाल्याचे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच,तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला असून,त्यांच्या भूमिके बाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

‘या कामांची चौकशी करा’ :

जिल्हा कृषी अधीक्षकांकडे सादर केलेल्या निवेदनानुसार,धोंडा मांडवा,कुंभेझरी येथील गट क्र.१,२,३,४ व ५,शेडवाई येथील गट क्र.१,२,३,६ व ७,नार पठार गट क्र.१ तसेच कोदेपूर येथील गट क्र.१ ते ८ मधील माती नाला बांधांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच कोदेपूर व नोकेवाडा येथील अनगड दगडी बांधांच्या कामांचीही विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

कंत्राटदारावर कारवाईची मागणी :

संबंधित निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करून त्याला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट)समाविष्ट करावे,कामांवर देखरेख करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी,तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी हकानी शेख यांनी केली आहे.

‘अन्यथा आंदोलन छेडू’ :

या प्रकरणाची निष्पक्ष विभागीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही,तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना,जिवती तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा हकानी शेख यांनी दिला आहे.

दरम्यान,या प्रकरणातील निकृष्ट काम,आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार तसेच अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत करण्यात आलेले सर्व आरोप,हे निवेदनकर्त्यांचे आहेत.या आरोपांची सत्यता सक्षम विभागीय चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.त्यामुळे कृषी विभागाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

#Jivati MNS #Chandrapur.

                            ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢