Gadchandur Police on Action mode : आगामी सण-उत्सवापूर्वी गडचांदूर पोलिसांची ‘फुल तयारी’ |Marathi News.

News@Root March..

              Gadchandur : आगामी गणेशोत्सव तसेच विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गडचांदूर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला.ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रूट मार्च (Root March)च्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच समाजकंटकांना पोलिसांची सज्जता दाखवून देण्यात आली.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते.मिरवणुका,धार्मिक कार्यक्रम,डीजे तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून हा रूट मार्च काढण्यात आला.

          पोलीस स्टेशनपासून सुरू झालेला रूट मार्च अचानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,गांधी चौक,महात्मा ज्योतिबा फुले चौक,जुने पटवारी ऑफिस,शेडमाके चौक,संविधान चौक, स्टेट बँक ऑफ इंडिया,सराफा लाईन,आंबेडकर भवन,गांधी चौक या शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत पुन्हा पोलीस स्टेशन येथे पोहोचला.त्यानंतर रूट मार्चची सांगता करण्यात आली.

     या रूट मार्चमध्ये ठाणेदार शिवाजी कदम यांच्यासह गडचांदूर पोलीस स्टेशनचे ४ पोलीस अधिकारी व १२ पोलीस कर्मचारी, क्यू.आर.टी.चंद्रपूर येथील ५ कर्मचारी तसेच दंगा नियंत्रण पथक चंद्रपूरचे २२ कर्मचारी,असे एकूण ३९ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

      आगामी सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावेत, यासाठी पोलिस प्रशासनाकडून शहरातील संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे आणि प्रमुख मार्गांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.तसेच अफवा पसरविणे,सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना,कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

नागरिकांनीही सण-उत्सवाच्या काळात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवत पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे,तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद बाबींची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी,असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

#गडचांदूर #पोलिस #रूटमार्च #गणेशोत्सव #कायदासुव्यवस्था #Chandrapur #Gachandur #Root March

                            ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢