Pune Truck-Bike Accident : रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी उत्साहाने निघालेल्या १४ वर्षीय मुलीचा आणि तिच्या वडिलांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चाकणजवळ घडली.मयुरी राजेंद्र भोर (वय १४) आणि तिचे वडील राजेंद्र भोर (वय ४७)अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात मयुरीची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,राजेंद्र भोर हे पत्नी आणि मुलगी मयुरी यांच्यासह दुचाकीवरून चाकणनजीकच्या वासुली परिसराकडे जात होते.याच दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव अवजड वाहनाखाली त्यांची दुचाकी आली.अपघाताची तीव्रता एवढी होती की,राजेंद्र भोर आणि त्यांची १४ वर्षीय मुलगी मयुरी यांचा जागीच मृत्यू झाला.मयुरीची आई या अपघातात गंभीर जखमी झाली.
मयुरी आपल्या लाडक्या भावाच्या हातावर प्रेमाची राखी बांधण्यासाठी आनंदाने निघाली होती.मात्र,रक्षाबंधनाच्या आनंदावर नियतीने घाला घातला.राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणीचा प्रवास काळाच्या पडद्याआड संपला,तर मुलीला गमावल्याने भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेने अवसरी तसेच चाकण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान,या दुर्घटनेनंतर चाकण परिसरातील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.परिसरातील वाहतूक व्यवस्था रस्त्यांची दुरवस्था आणि अवजड वाहनांच्या वाहतुकी बाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे.अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चाकण परिसरातील अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासन आता ठोस पाऊल कधी उचलणार? असा संतप्त सवाल या घटने नंतर स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
#Shocking News. #Truck-Bike Accident News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
