Pimpri : पुण्यातील वाकड (पिंपरी-चिंचवड)परिसरात रक्षाबंधनाच्या अवघ्या काही तास आधी शिल्पा सचिन गवारे(वय ४३),या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.रक्षाबंधनाच्या तयारीने घरात आनंदाचे वातावरण असतानाच एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी शिल्पा सचिन गवारेंचा गुरुवारी (दि.२७)पहाटे संशयास्पद मृत्यू झाला.
बुधवारी (दि.२६)रात्री आठच्या सुमारास शिल्पा नणंदेसोबत खरेदी करून घरी आल्या होत्या.रक्षाबंधनासाठी त्यांनी आवश्यक खरेदी पूर्ण केली होती.त्यानंतर सासरी जाताना त्यांनी भाऊ संतोष कलाटे यांच्याकडे पाहून मायेने हात केला.काही तासांनंतर हा निरोप अखेरचा ठरेल,याची कल्पना त्यावेळी कुटुंबातील कोणालाही नव्हती.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या हातून राखी बांधून घेण्याची तयारी करणाऱ्या संतोष यांनीही बहिणीसाठी साडी आणि ओवाळणीची तयारी केली होती.मात्र,सणाच्या आनंदाऐवजी कुटुंबीयांना शिल्पाच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागली.
गुरुवारी पहाटे एकच्या सुमारास शिल्पाचा दीर संदीप याने तिचा भाऊ रणजित याला फोन करून शिल्पा आणि तिचा पती सचिन यांच्यात भांडण झाल्याचे तसेच शिल्पाला काळेवाडी फाटा येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले.माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालय गाठले.मात्र,डॉक्टरांनी शिल्पाला मृत घोषित केले होते.
शिल्पाने बेडरूममधील सीलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे तिच्या पतीकडून सांगण्यात आले आहे.मात्र मृत्यूच्या परिस्थितीबाबत माहेरच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून,या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान,माध्यमांशी बोलताना भाऊ संतोष कलाटे यांनी, “ती जाताना मला हात करून गेली...” एवढेच सांगितले. बहिणीची आठवण होताच त्यांचा कंठ दाटून आला आणि अश्रूंना वाट मोकळी झाली.
रक्षाबंधनाच्या स्वागतासाठी बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाच्या वाट्याला यंदा तिचा अखेरचा निरोप आला.काही तासांपूर्वी निरोप देताना बहिणीने उंचावलेला हात आता भावाच्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे.
#Shocking News. #Raksha Bandhan Tragedy.#Marathi News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
