Electricity Bill : महावितरणचा ‘शॉक’! एक पंखा,दोन बल्ब अन् बिल ₹14 हजार 410 !|Marathi News.

News@electricity bill....

          Rajura : राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथे महावितरणच्या कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे विठ्ठल विश्वनाथ कोटरंगे यांच्या घरात केवळ एक पंखा आणि दोन बल्ब असतानाही तब्बल १४ हजार ४१० रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे.

महागाईच्या काळात दोन वेळच्या जेवणाची सोय करणेही कठीण असताना,महिन्याच्या कमाईपेक्षाही अधिक रकमेचे वीज बिल आल्याने कोटरंगे कुटुंबाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. त्यातच बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याची धमकी संबंधित कर्मचाऱ्यांकडून दिली जात असल्याचा आरोप ग्राहका कडून करण्यात आला आहे.

“१२ महिने रीडिंग नाही,आता अचानक हजारोंचे बिल!” :

          मागील बारा महिन्यांपासून अनेक ग्राहकांच्या वीज मीटरची प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे(एव्हरेज) बिले पाठविण्यात येत होती मात्र,तब्बल वर्षभरानंतर अचानक मीटर रीडिंग घेण्यात आली आणि त्यानंतर एकाच वेळी हजारो रुपयांची बिले ग्राहकांच्या माथी मारण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

         यामुळे राजुरा तालुक्यातील अनेक ग्राहकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.ही समस्या केवळ विठ्ठल कोटरंगे यांच्यापुरती मर्यादित नसून परिसरातील शेकडो ग्राहक अशाच प्रकारे त्रस्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

“जितकी महिन्याची कमाई नाही,त्यापेक्षा जास्त वीज बिल कसे भरायचे?” असा सवाल पीडित ग्राहकांकडून केला जात आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चूक असेल,तर त्याचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांनी का सहन करावा,असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.“बिल दुरुस्ती न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा” :

   या प्रकरणाची प्रशासन व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी,चुकीची व अवाजवी वीज बिले तात्काळ दुरुस्त करावीत आणि प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार वीज बिल भरण्याची संधी ग्राहकांना द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.बिलांमध्ये तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलन करून रस्त्यावर उतरण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

#electricity bill. #Rs.14,410 arrived at the laborer's house.

                         ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢