Chandrapur : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर सत्तुरने डोक्यावर, हातावर व पायावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.आरोपीवर कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा निकाल ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सुनावण्यात आला.
दि.३ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता फिर्यादी महिला हॉस्पिटलचे काम आटोपून घरी परतत असताना स्वागत मंगल कार्यालयाच्या मागील परिसरात आरोपी पतीने तिला घरी चल असे सांगितले.मात्र,फिर्यादीने घरी जाण्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत सत्तुरने तिच्या डोक्यावर, हातावर व पायावर दोन-तीन वेळा वार केले.या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर फिर्यादीच्या बयानासह वैद्यकीय अहवालाच्या आधारे ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.क्र.४८/२०२३,कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली.
त्यानंतर तपासी अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करत प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब,वैद्यकीय अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले.तपास पूर्ण करून वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयाचा निकाल :
सदर खटल्याची सुनावणी पी.एम.गुप्ता,जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर यांच्या न्यायालयात झाली.सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड.सुधाकर डेगावार यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने सादर केलेले साक्षीपुरावे व उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस कलम ३०७ भादंवि अंतर्गत दोषी ठरविले.
न्यायालयाने आरोपीला ५ वर्षे सक्त कारावास आणि ₹५,००० दंड अशी शिक्षा सुनावली.दंडाची रक्कम न भरल्यास १ महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
तपास व न्यायालयीन पैरवी :
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र प्रभाकर उपरे, पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांनी केला.न्यायालयीन कामकाजात सरकारी अभियोक्ता ॲड.सुधाकर डेगावार यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.पोलीस अंमलदार प्रकाश शेंदरे (ब.नं.२२७),पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर यांचेही सहकार्य लाभले.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी,ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.
#Chandrapur District Crime News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
