Gadchandur : महावितरण कार्यालयाच्या परिसरातील मोकळ्या जागेत ठेवलेले भूमिगत वीजवाहिन्यांचे सुमारे २० लाख रुपये किमतीचे केबल वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.२१ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही चोरी झाल्याचा संशय असून,यासंदर्भात गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,संबंधीत कंपनीकडून १ जुलै २०२६ रोजी दमण येथून ११ केव्ही क्षमतेचे १८५ स्क्वेअर एम.एच. चे केबल वायर गडचांदूर येथे आणण्यात आले होते.गडचांदूर, बिबी,नांदा व इतर गावांमध्ये भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी हे केबल महावितरण कार्यालयाच्या इमारतीलगत असलेल्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते.पावसाळा आणि काही ठिकाणी कामासाठी परवानगी न मिळाल्याने या केबलचा वापर होऊ शकला नव्हता.कंपनीकडून वेळोवेळी केबलची पाहणी केली जात होती.२१ सप्टेंबर रोजी केलेल्या पाहणीत केबल जागेवर असल्याचे आढळले होते.मात्र,४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता कामासाठी केबल घेण्यास गेले असता,तेथे ठेवलेले चार केबल ड्रम आणि त्यातील वायर गायब असल्याचे निदर्शनास आले.परिसरात शोध घेऊनही केबलचा शोध लागला नाही. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून,पोलीसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
#Gadchandur. #Crime News.

