Gadchandur : सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असून या उत्सवात ठिकठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडतांना दिसत आहे.याच श्रेणीत राजुरा तालुक्यातील तोहगाव येथील एका मुस्लिम मुलीने रेखाटलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर चित्र,सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.कु.एकरा सैय्यद, असे मुलीचे नाव असून एकराने तिच्या कलाकौशल्याने तयार केलेली बाप्पाची रंगीत प्रतिमा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.या चित्रातून तिने सांस्कृतिक एकता आणि समन्वयाचा संदेश दिला आहे. एकराने कर्मवीर विद्यालय येनबोडी,येथून 10 वी उत्तीर्ण केली तर 12 वी तोहगाव येथील आश्रम शाळेत पूर्ण केल्यानंतर एका वर्षापासून 'शिखा शर्मा आर्ट इंस्टिट्यूट इंदोर', येथे चित्रकलेचे धडे गिरवत आहेत.तिला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे.यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिने गणपती बाप्पाचे चित्र रेखाटण्याचा निर्णय घेतला.तिने या चित्रात गणपती बाप्पाला पारंपरिक शैलीत रेखाटले आहे,ज्यात रंगांचा सुंदर मेळ आणि बारीकसारीक तपशील,प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.एकराच्या या कलाकृतीचे प्रचंड कौतुक होत असून अनेकांनी तिच्या या कलेला सांस्कृतिक एकतेचे प्रतीक म्हणून संबोधले आहे.स्थानिक गणेश मंडळाने एकराला सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याची तसेच बाप्पाचे हे चित्र मंडळाच्या प्रदर्शनात ठेवण्यात येणार असल्याचे कळते.हा प्रसंग गणेशोत्सवाच्या उत्साहात एक नवा रंग घेऊन आला,ज्यामुळे सर्वधर्मसमभावचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.एकराच्या कलाकृतीने अनेकांना प्रेरणा दिली असून,तिच्या पुढील कलाकृतीची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
'काय म्हणाली एकरा'
'मला गणपती बाप्पाच्या उत्सवातील रंग आणि उत्साह खूप आवडतो.माझ्या चित्रातून मी बाप्पा प्रती माझी श्रद्धा आणि सर्वधर्मसमभाव व्यक्त करू इच्छिते,' असे एकरा सैय्यद म्हणाली.
'वडिलांनी व्यक्त केले मत.'
'आम्हाला आमच्या मुलीच्या या कृतीचा खूप अभिमान आहे.ती नेहमीच सर्व धर्माचा आदर करते आणि तिच्या कलेतून हा संदेश पुढे नेत आहे.' असे मौलिक मत एकराचे वडील रिज़वान सैय्यद,यांनी व्यक्त केले आहे.'
#A Muslim girl drew a beautiful picture of Lord Ganesha.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@