Pune Rape,Shocking News : पुणे येथील कोंढवा परिसरात रात्री एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना 2 जुलै बुधवार रोजी समोर आली आहे.ही घटना कोंढव्यातील एका उच्चभ्रू आणि गार्डेड सोसायटीत घडल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.आरोपीने 'कुरिअर बॉय' असल्याचे भासवत सोसायटीत प्रवेश केला आणि पीडितेच्या घरात घुसून तिला बेशुद्ध करत अत्याचार केला.
प्राप्त माहितीनुसार,ही घटना बुधवारी(2 जुलै)रात्री 7,30 च्या सुमारास घडली.पीडित तरुणी मूळची अकोल्याची असल्याचे कळते.ती सध्या आपल्या भावासोबत कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत असून पुण्यातील कल्याणी नगर भागातील एका IT कंपनीत ती कार्यरत आहे.घटनेच्या दिवशी आरोपीने स्वतःला 'कुरिअर डिलिव्हरी बॉय' असल्याचे सांगून गेटवरून आत प्रवेश मिळवला.त्याने सुरक्षा रक्षकांना बँकेच्या कुरिअरबाबत सांगितले आणि कुठलीही योग्य शहानिशा न करता त्याला सोसायटीत प्रवेश देण्यात आला.त्यानंतर आरोपी थेट पीडितेच्या दरवाज्यापर्यंत पोहोचला.आणि “कुरिअर आहे” असे सांगितले.पीडितेने ते कुरिअर आपले नाही,असे सांगून नकार दिला.मात्र,आरोपीने “सही करावी लागेल” असे सांगत तिच्यावर दबाव टाकला.त्यामुळे पीडितेने सेफ्टी डोअर उघडला आणि त्याच क्षणी आरोपीने तिच्या तोंडावर केमिकल स्प्रे फवारला.ती काही क्षणांतच बेशुद्ध झाली आणि आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
सदर घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.सध्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या नेतृत्वाखाली 10 तपास पथके काम करत आहे. सोसायटीतील CCTV फुटेज तपासण्यात आले.आरोपीने चेहरा झाकलेला होता का? त्याने आधी रेकी केली होती का? अशा सर्व शक्यतांचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली,ती सोसायटी “हाय-सेक्युरिटी झोन” म्हणून ओळखली जाते.त्यामुळे सुरक्षा रक्षकांकडून दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा सध्या तपासाचा प्रमुख भाग ठरत आहेत.सोसायटी व्यवस्थापन व सिक्युरिटी एजन्सीची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पोलिसांनी महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने सोसायटी व्यवस्थापनांना काही सूचना दिल्या असून,अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे कळते.आरोपी सध्या फरार असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना पुण्या सारख्या शहरात,तेही सुरक्षारक्षक असलेल्या परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.महिला सुरक्षेबाबत शासन व स्थानिक प्रशासनाने अधिक कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
#Shocking News...
#Pune Rape Case...
#25 Year Old Girl Raped By Fake Delivery Boy...
@@@@@@@@@@@@@@@@@@@@