Chandrapur : मोबाईल फोन अचानक रिसेट झाल्यानंतर एका युवकाच्या बँक खात्यातून गुगल-पेद्वारे 68 हजार 900 रुपये परस्पर काढून घेतल्याची धक्कादायक घटना वरोरा येथे उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे,अवघ्या 25 मिनिटांच्या कालावधीत खात्यातील जवळपास संपूर्ण रक्कम दुसऱ्या खात्यात वळती करण्यात आली.याप्रकरणी वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास सुरू आहे.
प्रप्त माहितीनुसार,सुनील सुरपसिंग भयडिया(वय 21,रा.चिलकदा पोस्ट जि.अलीराजपूर,मध्यप्रदेश),हा युवक वरोरा येथील महालक्ष्मी कंपनीत डोझर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. त्याचे पंजाब नॅशनल बँकेच्या वरोरा शाखेत बचत खाते असून,सदर खाते त्याच्या जिओ मोबाईल क्रमांकाशी जोडलेले आहे.
दरम्यान 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.5 वाजताच्या सुमारास सुनीलने गुगल-पेद्वारे आपल्या चुलत भावाला 2 हजार रुपये पाठविले.त्यानंतर त्याने मोबाईल चार्जिंगला लावला आणि आंघोळीसाठी गेला.सुमारे 15 मिनिटांनी परत आल्यानंतर त्याचा मोबाईल अचानक रीसेट झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
काही वेळाने गुगल-पेद्वारे व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या बँक खात्यात केवळ 79 रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले.त्यामुळे त्याने दुसऱ्या मोबाईलवरून खात्याची तपासणी केली असता,दुपारी 12.30 वाजेपर्यंत खात्यातून तब्बल 68 हजार 900 रुपये अन्य खात्यात वळते झाल्याचे समोर आले.या प्रकारानंतर सुनीलने तत्काळ सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवून वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी वरोरा पोलिसांनी 9 नोव्हेंबर रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66(क),66(ड) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीमागील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
#Cyber Fraud Case. #Chandrapur.

