Illegal plot sale case at Gadchandur : कृषक जमिनीवरील नियमबाह्य प्लॉट विक्री प्रकरण...

News@Illegal Plot...

      Gadchandur : गडचांदूर शहरातील काही 'व्हाइट कॉलर' दलाल भुमाफिया वेगवेगळ्या युक्त्या वापरून शासनाने हस्तांतरण बंदी घातलेल्या आदिवासी बांधवांच्या कृषक शेत जमिनीवर गेल्या कित्येक वर्षांपासून नियमबाह्य प्लॉट टाकून शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर सर्रासपणे विक्री करीत असल्याचे गंभीर प्रकार घडत आहे.यामुळे शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असून या प्लॉटची स्थानिक नगरपरिषदेत नोंद होत नसल्याने प्लॉट धारकांना मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागतात.असाच एक प्रकार येथील प्रभाग क्रमांक 2 मधील लखमापूर रोडवरील शेत सर्व्हे नंबर 93/1च्या कृषक जमिनीची अकृषक मंजूरी न घेता नियमबाह्य पद्धतीने प्लॉट टाकून विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे.ही प्लॉट विक्री थांबवावी,अशी मागणी गडचांदूर नगरपरिषदेत विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी तहसीलदार कोरपना व गडचांदूर नगरपरिषद मुख्याधिकारी,यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.    नगरसेवक डोहे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मौजा गडचांदूर येथील शेत सर्व्हे नंबर 93/1 क्षेत्र 1.16 हेक्टर आर,जमीन भूषणदेवी लटारी आत्राम,माधूरी झित्रा टेकाम, सुशीला सुधाकर तुकाराम,माया वामन कोडापे,प्रतीभा सुधाकर टेकाम,पूर्वी सुधाकर टेकाम,यांच्या मालकीची असून सदर सातबाराच्या इतर अधिकारात हस्तांतरणास बंदी म.ज.म.अ. 1966,कलम 36 व 36 अ,अन्वय हस्तांतरणास बंदी(आदिवासी खातेदार)असे नमूद असताना कुठलीही शासनाची परवानगी न घेता गैरआदिवासी भुमाफियांनी आदिवासी कडून कवडीमोल भावाने खरेदी केली व त्या शेतात प्लॉट टाकुन शंभर रूपयाच्या स्टँप पेपरवर सर्रासपणे प्लॉटची विक्री चालू असून हे सर्व बेकायदेशीर आहे.यामुळे एकीकडे शासनाचे आर्थिक नुकसान तर,दुसरीकडे आदिवासी बांधवांची फसवणूक होत आहे.त्या शेताची अकृषक मंजूरी नसल्याने प्लॉट धारकाकडून नगरपरिषदेला फेरफार शुल्क,डेव्हलपिंग चार्ज तसेच घर बांधकाम परवानगी शुल्क मिळत नसल्याने नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे.      असे असताना प्लॉट विकणारे पैसे घेऊन मोकळे होतात आणि ले-आऊट मधील प्लॉट धारक पक्के रस्ते,नाली,विद्युत,पाणी,या मुलभूत सोयीसुविधांची मागणी नगरपरिषदे कडे करू शकते.मात्र कुठलाही आर्थिक लाभ मिळत नसल्याने त्यांना सोयीसुविधा पुरविणे नगरपरिषदेला परवडणारे नाही.या बाबी लक्षात घेऊन सदरचे नियमबाह्य होत असलेले प्लॉटची विक्री बंद करण्याच्या सुचना द्यावी.तसेच असे नियमबाह्य,बेकायदेशीर प्लॉट खरेदी करू नये, अशा पद्धतीची जाहीर विविध माध्यमातून करावी,अशी मागणी नगरसेवक डोहे यांनी केली आहे.आता तहसीलदार व मुख्याधिकारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

#Illegal Plot Sale in Gadchandur City...

  🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹