Chandrapur : राज्यातील रस्ते अपघातांच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यावर आणखी एक मोठी शोकांतिका कोसळली आहे.भात लावणीच्या हंगामी कामासाठी शेजारील तेलंगणा राज्यात गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील पवना चक येथील शेतमजूर दरवर्षीप्रमाणे यंदाही उदरनिर्वाहासाठी तेलंगणात भात लावणीच्या कामासाठी गेले होते. गुरुवारी शेतातील काम पूर्ण करून ते आपल्या निवासस्थानी परतत असताना रामगुंडम परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अतुल वासुदेव सोनले (45), अर्चना जनार्धन सोनले (40), प्रभा सिताराम मोहर्ले (56) आणि रंजना प्रभाकर शेंडे (50) यांचा समावेश आहे.
या अपघातात 27 मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने रामगुंडम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासनाकडून मृतदेह मूळ गावी आणण्याची प्रक्रिया सुरू असून जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत आणि इतर सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
#Chandrapur #Accident #Telangana #BreakingNews #Farmer #RoadAccident #MarathiNews.#Chandrapur labour vehicle accident.4 death 27 injured.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
